नवी दिल्ली – गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेस पक्ष केंद्रातील सत्तेपासून दूर आहे. तसेच एकामागून एक राज्यांत कॉंग्रेसची पकड ढिली होत गेल्याने बहुतांश राज्ये पक्षाच्या अधिपत्याखालून निसटली आहेत. काही विधानसभा आणि काही पोटनिवडणुकांतील यश वगळता कॉंग्रेसकडे सध्या तरी सांगण्यासारखे काही नाही. अशातच पक्षाच्या अध्यक्षपदावरुन राहुल गांधी यापूर्वीच पायउतार झाल्याने, आणि पुन्हा एकदा सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष व्हावे लागल्याने, आता या पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार तरी का; आणि मिळाल्यास कधी, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीतून पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यावर एकमत घडवण्याचे प्रयत्न कॉंग्रेसमध्ये सुरू झाले आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येत्या शनिवारी, 19 डिसेंबरला पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसमधील नाराज ज्येष्ठ नेत्यांनाही आमंत्रित केले आहे. या नेत्यांनी अलीकडेच पक्षात कायमस्वरूपी अध्यक्ष निवडून संघटनेत बदल करण्याची मागणी करणारं पत्र लिहिले होते. या बैठकीत सोनिया गांधी पक्षाच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, असे सांगण्यात येत आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अलीकडेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. आपण स्वतःहून नाराज नेत्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करावी, असा सल्ला कमलनाथ यांनी सोनियांना दिल्याचे बोलले जात आहे. कारण नाराज नेते हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांची स्वतःची एक राजकीय पत आहे.
सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ येथील निवासस्थानी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली. कॉंग्रेसच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक जानेवारीच्या अखेरीस होणार असून पक्षाच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे याला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी 19 तारखेला म्हणजे शनिवारच्या बैठकीत नाराज असलेल्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रित केले आहे. या नेत्यांना सोनिया भेटतील आणि त्यांची नाराजी दूर करून पक्षाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील.
शिवाय अहमद पटेल यांच्यासारखा अनुभवी नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने राष्ट्रीय पातळीवरील सर्वमान्य नेत्यांची तसेच तरुण नेत्यांची उणीव पक्षाला जाणवत आहे. त्यामुळे दि. 19 च्या बैठकीत पक्षाध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर विचार होतो, हे पहाणेही रंजक ठरणार आहे.