श्रीरामपूर , (प्रतिनिधी) – श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वा. लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी दिली.
यावेळी आमदार लहू कानडे यांच्या कार्यकाळातील (सन २०१९-२०२४) जनकार्याचा अहवाल तसेच आ. कानडे यांच्या नवीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आमदार थोरात यांच्याहस्ते होणार आहे.
ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, याप्रसंगी माजी विधान परिषद सदस्य सुधीर तांबे, ज्येष्ठ साहित्यिक व माजी संपादक उत्तम कांबळे, आ. सत्यजित तांबे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा लताताई डांगे,
युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्मितल वाबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी केले आहे.