भोपाळ – मध्यप्रदेशात सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसचे आमदार पीसी शर्मा आणि माजी नगरसेवक गुड्डू चव्हाण यांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
एका रुग्णावर उपचार करत असताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत या दोघांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केली होती. आपण रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, असे जेपी हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी योगेन्द्र श्रीवास्तव यांनी सांगितले.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टर श्रीवास्तव यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी हे प्रकरण दाखल केले असून रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच काही प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाबही नोंदवले जात आहेत.
शनिवारी दुपारी एका रुग्णाला जेपी हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले होते. या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खूपच खालावली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यातूनच पीसी शर्मा यांनी हस्तक्षेप केला आणि रुग्णालयात जाऊन डॉक्टर श्रीवास्तव यांच्या बरोबर वाद घातला. याचवेळी डॉक्टरांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती.