वंदना बर्वे
नवी दिल्ली – उत्तराखंडचे पर्यटन मंत्री जागतिक ख्यातीचे अध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांच्या विरोधात कॉग्रेसला उमेदवार सापडत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपातून कॉग्रेसमध्ये आलेले हरकसिंग रावत यांना त्यांच्याविरोधात उतरविण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
सविस्तर वृत्त असे की, कॉग्रेसने आज उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना रामनगरमधून तिकीट देण्यात आले आहे. परंतु, चौबट्टाखाल या मतदारसंघातून कुणाला मैदानात उतरवायचे? याचे उत्तर कॉग्रेसला अद्याप सापडलेले नाही.
दरम्यान, भाजपातून नुकतेच कॉग्रेसमध्ये आलेले हरकसिंग रावत यांना सतपाल महाराज यांच्याविरूध्द रिंगणात उतरवायचे यावर विचार सुरू असल्याचे समजते. सतपाल महाराज आधी कॉग्रेसमध्ये होते. 2017 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता ते उत्तराखंड सरकारमध्ये पर्यटन मंत्री आहेत.
कॉग्रेसने हरकसिंग रावत यांना तिकीट दिले तर सतपाल महाराज यांच्या विजयाची वाट अवघड होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कॉग्रेसने हरकसिंग रावत यांच्या सुनेला लैंसडाउनमधून आधीच उमेदवारी दिली आहे.