पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांकडून निवेदन
हडपसर – राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकरिता माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. याबाबतचे निवेदन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे कार्यकर्ते स्वप्निल डागमाळी यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर हे गेली 40 वर्षे पक्षाशी निष्ठावंत असलेले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, राज्यमंत्री, पुणे शहर अध्यक्ष अशा अनेक पदावर अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे, त्यांच्या अध्यक्ष पदाच्या काळात पक्ष संघटना अत्यंत मजबूत होती. शिवरकर यांचा सर्व जातीधर्मातील नागरिकांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. लहान मोठ्या कार्यकर्त्यांशी आपुलकीचे संबंध आहे.
मतदार संघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. शिवरकर यांना उमेदवारी दिली तर पुणे शहरात कॉंग्रेस मजबूत आणि भक्कम होईल. शिवरकर यांच्यामुळे महाराष्ट्रात ओ.बी.सी.समाजाला प्रतिनिधित्व मिळेल. पुणे शहरात पक्षांची परिस्थिती सध्या अत्यंत वाईट व चिंताजनक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून विधान परिषद निवडणूक करिता बाळासाहेब शिवरकर यांना उमेदवारी देणे योग्य ठरेल, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे डागमाळी यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, करोनाच्या संकटात विधानसभा, विधान परिषदेच्या माजी आमदारांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे, असे आवाहन माजी मंत्री शिवरकर यांनी विविध पक्षाच्या राज्यभरातील माजी आमदारांना केले होते. त्यांच्याशी स्वत: संपर्क साधला होता. त्याला माजी आमदारांनी मोठा प्रतिसाद दिला. बाळासाहेब शिवकर यांच्या शब्दाला आजही राज्यभरात मान दिला जातो. सर्वच राजकीय पक्षात त्यांचे मित्र आहेत, यामुळे असा नेता विधानपरिषदेवर असावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.