प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचा “निर्धार’

पुणे – कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी पश्‍चिम महाराष्ट्राच्या जिल्हानिहाय बैठका पार पडणार असून, यातून विधानसभेसाठी उमेदवाराची चाचपणी केली जाणार आहे. मात्र, या बैठकीला प्रमुखांनाच निमंत्रित करण्यात आले आहे.

या बैठकीला अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी सचिव सोनमबेन पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, आमदार यशोमती ठाकूर, आमदार बसवराज पाटील, मुझफ्फर हुसेन, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष तसेच विविध सेलचे पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, कऱ्हाड, पुणे शहर आणि जिल्हा येथील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मतदार संघ कसे आहेत, प्रभागांमधील अनुकुलता या सगळ्याबरोबरच उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी असल्याने कोणत्या मतदार संघात कॉंग्रेसचे प्राबल्य आहे आणि कोणत्या जागा राष्ट्रवादी मागू शकते; याचीही या निमित्ताने माहिती घेतली जाणार असल्याचे समजते.

अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची ही पहिली भेट असली तरी त्याला “सदिच्छा’ भेट असे आता म्हणता येणार नाही. तसेच ही प्राथमिक बैठक असली, तरी विधानसभेला आता काहीच दिवस राहिल्याने सत्कार स्वीकारत बसण्यापेक्षा विधानसभेच्या अनुषंगाने या बैठका ठरवण्यात आल्या आहेत.

शनिवारी सकाळी
11 वाजल्यापासून या बैठका कॉंग्रेसभवन येथे होणार आहेत. तर, सायंकाळी कोथरूड येथील गांधीभवन येथे “निर्धार’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले असून, थोरात त्यालाही उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.