राज्यात व देशात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसह काही मित्र पक्षाची युती आघाडी विधानसभेसाठी झालेली आहे. इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे या दोन वजनदार नेत्यामुळे दोन्ही पक्षात निर्णय घ्यायचा काय, यात संभ्रम अवस्था निर्माण झाल्यामुळे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते गॅसवर आहेत.
जिल्ह्यात दमदार कॉंग्रेस नेतृत्व म्हणून इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेसचे नेते, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिले जाते. 2014 साली कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले असल्यामुळे इंदापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भरणे हे आमदार झाले. माजी मंत्री पाटील पराभूत झाले.
त्यामुळे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यातील राजकीय गणिते वाऱ्यासारखी फिरली. आमदार भरणे यांनी अवघ्या साडेचार वर्षात साडेनऊशे कोटी रकमेचा निधी खेचून आणला. माजी मंत्री पाटील हे कोणत्याही सत्तेत नव्हते. तरीदेखील कॉंग्रेस वाढीसाठी योगदान देत पक्ष संघटन बांधणीचे काम केले. नीरा भीमा साखर कारखाना, इंदापूर नगरपरिषद, कर्मयोगी साखर कारखाना, तालुक्यातील ग्रामपंचायती आपल्या अधिपत्याखाली ठेवल्या आहेत.
इंदापूर विधानसभा जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे आघाडीशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते कोणता झेंडा घेऊ हाती, या मानसिकतेत आहेत. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, स्थानिक नेते इंदापूरच्या बदलत्या राजकीय घडामोडीवर लक्ष केंद्रीत करून आहेत. त्याचे दूरगामी परिणाम इंदापूरच्या राजकीय पटलावर उमटणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या आखाड्यात राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.