कोल्हापुर: पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकत्रच लढणार

कोल्हापुर: कोल्हापुरातील सिद्धार्थनगर व पद्माराजे उद्यान प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकसंधपणे सामोरे जाणार आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता आहे. आघाडीचे संख्याबळ कायम राखण्यासाठी एकत्रित लढण्याबाबत एकमत झाले आहे.

राष्ट्रवादीचे सिद्धार्थनगर प्रभागाचे नगरसेवक अफजल पिरजादे आणि पद्माराजे उद्यान प्रभागाचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांचे पक्षातंरबंदी कायद्यामुळे पद अपात्र ठरले. यापूर्वीच काठावरील बहुमत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का होता. जातवैधता प्रमाणपत्रामुळे पाच आणि अनधिकृत बांधकामामुळे दोन अशा सात नगरसेवकांवर पद अपात्रतेची टांगती तलवार असताना पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

काठावरील बहुमतामुळे भाजप-ताराराणी आघाडीकडून धोका असताना आणि संख्याबळ कमी होत असल्याने दोन्ही प्रभागातील पोटनिवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय सत्तारुढ गटाने घेतला आहे. याबाबतचा औपचारिक निर्णय सोमवारी होणार आहे. एकीकडे सत्तारुढ आघाडी एकसंधपणे पोटनिवडणुकीला सामोरे जात असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये मात्र अद्याप शांतता दिसते. पोटनिवडणुकीवर लोकसभा निवडणुकीचे सावट असल्याने विरोधी आघाडीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापूर्वी ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणुकही सत्तारुढ गटाने एकत्र येऊन लढवली होती. या निवडणुकीत सत्तारुढ गटाला अपयश आले असले, तरी पुन्हा या दोन्ही प्रभागातील पोटनिवडणूक एकत्र लढवणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.