नव्या आघाडीची चर्चा होण्याची शक्यता
मुंबई : राज्यात स्थिर सरकार देण्यात कोणत्याही पक्षाला यश आले नाही त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पाठिंब्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात लवकर सरकार स्थापन होण्याच्या शक्यता सध्या तरी दिसत नाही. दरम्यान, या सर्व गोंधळात आता सर्वांचे लक्ष आज पार पडणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत राज्यातील नव्या आघाडीबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यात का उशीर होत आहे, याबाबत ते त्यांना माहिती देणार आहेत. तसेच या बैठकीत शिवसेनेची पुढील रणनितीदेखील ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नव्या आघाडीचे नाव काय असेल? तसेच तीन पक्ष एकत्र आले तर येत्या मुंबई महानगरपालिकेत निवडणुकांची स्थिती कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते नव्या आघाडीच्या महाशिवआघाडी या नावावर अनुकुल नसल्याची माहिती समोर आली आहे. आम्हाला नव्या आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाचे नाव नकोय. एनडीए आणि युपीएमध्येदेखील कोणत्याही पक्षाचे नाव नाही, असे एका नेत्याने सांगितले. यापूर्वी ही बैठक मंगळवारी पार पडणार होती. परंतु माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यानं ही बैठक पुढे ढकलण्यात आली.
आज पार पडणाऱ्या या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के.सी.वेणुगोपाल आणि राज्यातील काही नेते मंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील सहभागी होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्याते आली.