शेतकरी, सलून, फूलविक्रेत्यांनाही मदत द्या; नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाना पटोले यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

मुंबई – राज्य सरकारने करोनाच्या पार्स्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्‍सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले आणि छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक चक्र काहीसे थांबणार असल्याने आर्थिक दुर्बल घटकांना मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यासाठी पाच हजार कोटींहून जास्त पॅकेजची घोषणा केली आहे.

पत्रात उल्लेखलेले घटक हेही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामचीही या साथीच्या काळात ससेहोलपट सुरू आहे. त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.