थिरूवनंतपूरम : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काही मुद्द्यांवरून पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून आले. अशात पक्षाच्या केरळमधील मुखपत्रातून थरूर यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिका दौरा केला. त्या दौऱ्यातील काही बाबींवरून कॉंग्रेसने मोदींवर टीका केली. मात्र, थरूर यांनी मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केलेल्या चर्चेची प्रशंसा केली.
एवढेच नव्हे तर, थरूर यांनी डाव्या पक्षांची सत्ता असणाऱ्या केरळमधील उद्योजकता वाढीचेही कौतुक केले. त्या राज्यात डावे पक्ष आणि कॉंग्रेस एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. साहजिकच, थरूर यांचे केरळविषयक भाष्य कॉंग्रेसची अस्वस्थता वाढवणारे ठरले. अर्थात, थरूर यांनी त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. मी केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारचे कौतुक केले नाही. केवळ स्टार्टअप क्षेत्रात राज्याच्या होत असलेल्या प्रगतीकडे लक्ष वेधले, असे त्यांनी नमूद केले.
मात्र, थरूर यांच्या स्पष्टीकरणाने बहुधा कॉंग्रेसचे समाधान झाले नाही. त्यातून पक्षाच्या केरळमधील मुखपत्राच्या अग्रलेखातून नामोल्लेख टाळून थरूर यांना लक्ष्य करण्यात आले. केरळमध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात सरकारविरोधी भावना आहे. ती दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. कॉंग्रेसचे हजारों कार्यकर्ते आगामी निवडणुकांबाबत मोठ्या आकांक्षा बाळगून आहेत. त्यांचा विश्वासघात केला जाऊ नये.
डाव्या पक्षांच्या सरकारच्या उणीवांवर कॉंग्रेस बोट ठेवत आहे. अशावेळी पक्षाला आतूनच कमजोर करण्याची कृती आत्मघाती ठरेल. अनुकूल वातावरण असूनही कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला अपयश आल्यास ती मोठी पीछेहाट ठरेल, अशा कानपिचक्या अग्रलेखातून देण्यात आल्या. थरूर केरळमधल्याच थिरूवनंतपूरमचे खासदार आहेत.