काँग्रेस आमदाराच्या पुतण्याची आक्षेपार्ह पोस्ट; हिंसाचारात २ ठार तर ६० पोलीस जखमी

नवी दिल्ली – कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका वादग्रस्त पोस्टवरून संतप्त जमावाने मंगळवारी रात्री कॉंग्रेस आमदाराच्या घरावरच हल्ला केला. आणि काही भागात जातीय हिंसाचार भडकला. संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, उत्तर बंगळुरुच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या पुतण्याने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट पोस्ट शेअर केली होती. याविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. मात्र, पोलिसांनी आपापसात प्रकरण सोडविण्यास सांगितले. यानंतर नागरिकांनी आमदार श्रीनिवासमूर्ती यांच्या घराला घेराव घालून थेट दगडफेक सुरू केली.

आंदोलकांनी आमदाराच्या घराला आगही लावण्याचा प्रयत्न केला. तसेच घराला लावण्यात आलेली आग विझण्यासाठी आलेला अग्निशमन दलाच्या गाड्यांना देखील आंदोलकांनी पुढे येऊ दिले नाही.  ज्यावेळी जमावाने घरावर हल्ला केला तेव्हा आमदार त्यांच्या घरात नव्हते.

बेंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह ६० पोलीस कर्मचारीही या हिंसाचारात जखमी झाले आहेत. त्यामुळे बेंगळुरूमध्ये सीआरपीसीचा कलम१४४ लागू करण्यात आला आहे. तर या प्रकरणी आतापर्यंत ११० लोकांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.