भोपाळ – मध्यप्रदेशात कॉंग्रेसला लागलेले गळतीसत्र कायम आहे. त्या पक्षाचे आमदार सचिन बिर्ला यांनी रविवारी सत्तारूढ भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मागील वर्षाच्या (2020) मार्चपासून भाजपमध्ये दाखल झालेल्या कॉंग्रेस आमदारांची संख्या 27 वर पोहचली आहे.
लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सध्या मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात एका प्रचारसभेत बिर्ला यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ती घडामोड कॉंग्रेससाठी मोठा हादरा मानली जात आहे.
मागील वर्षी मार्चमध्ये कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी एकाच वेळी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार अवघ्या 15 महिन्यांत कोसळले. त्यानंतर भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आणखी 4 आमदारांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
आता बिर्ला यांच्या रूपाने आणखी एका आमदाराने पक्षबदल केला आहे. त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेस आमदारांचे संख्याबळ घटून 94 होईल. एकूण 230 संख्याबळ असणाऱ्या मध्यप्रदेश विधानसभेत भाजपचे 125 आमदार आहेत.