सोलापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत राहिले आहेत. आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे हे दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच त्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
आमदार म्हेत्रे यांना पराभूत करण्यासाठी अक्कलकोटमध्ये एका महाराजांना उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे म्हेत्रे यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यातच भाजपच्या या तगड्या नेत्यांसमोर आपली डाळ शिजणार नाही याची जाणीवसुद्धा त्यांना झाल्याने म्हेत्रे यांच्या भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामार्फत म्हेत्रे प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर अक्कलकोट येथे आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांनीसुद्धा आता कॉंग्रेसला हात दाखविण्याचा सल्ला देत भाजपात प्रवेश करण्याचे सांगितले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनीसुद्धा चाचपणी सुरू केली आहे. भालके यांनी कॉंग्रेस न सोडल्यास त्यांना अन्य तगड्या उमेदवाराला उभे करुन भालके यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने आमदार भालके द्विधा मनःस्थितीत आहेत. आजच्या मुलाखतीला गैरहजर राहीलेले आमदार म्हेत्रे यांनी परगावी असल्याचे सांगितले आहे, तर आमदार भालके यांचा संपर्क क्रमांक बंद असल्याने संशय वाढला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी एकमेव मुलाखत दिली आहे.