पदुच्चेरी – पदुच्चेरीत कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये आज जोरदार राडा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कॉंग्रेस प्रचार समितीची बैठक होती. या बैठकीत एका नेत्याने डीएमके पक्षाचा झेंडा फडकवल्याने गोंधळ सुरू झाला. यावेळी पदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी देखील उपस्थित होते.
कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी कार्यालयाच्या बाहेर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. पण आतमध्ये कार्यकर्त्यांमध्येच ही हाणामारी झाली. पदुच्चेरीतील 30 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कॉंग्रेस पक्ष 30 पैकी 15 जागा लढवत असून 13 जागा द्रमुक पक्ष लढवत आहे. तर सीपीआय आणि व्हीसीके या मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.
पदुच्चेरीमध्ये मागच्या महिन्यापर्यंत नारायणस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेसचे सरकार होते. मात्र पक्षातील बंडखोरीमुळे नारायणस्वामी सरकारचा विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पराभव झाला. माजी उपराज्यपाल किरण बेदी आणि केंद्र सरकारने आपले सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता.
यापूर्वी 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुकने 2 जागी विजय मिळवला होता. भाजपाला मागील निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. यंदा मात्र पक्षाने विधानसभा निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. कर्नाटकनंतर अन्य दक्षिण भारतामधील राज्यात भाजपाचे सरकार येऊ शकते, असा अंदाज देखील काही निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.