रावत यांना विश्वास: पक्ष संघटना मजबूत करण्याची मांडली भूमिका
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट होऊनही अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम आहे. त्यातूनच राहुल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पराभवापासून विजयाकडे आगेकूच करेल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत यांनी म्हटले आहे.
सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जोर का झटका बसला. कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला. कॉंग्रेस कार्यकारिणीने तो प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी राहुल निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी राहुल अध्यक्ष आहेत आणि राहतील, असे बुधवारी नमूद केले.
त्यानंतर रावत यांनी राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त केला. पक्ष प्रवक्त्यांच्या वक्तव्यात कार्यकर्त्यांच्या भावनांचेच प्रतिबिंब उमटले आहे. निवडणुकीत आम्ही यशस्वी ठरलो नसलो तरी पक्ष संघटना मजबूत करून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वेषयुक्त प्रचारापुढे आव्हान उभे करू शकतो, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.