मोदींची स्तुती केल्याबद्दल कॉंग्रेस नेत्याची हकालपट्टी

थिरुवनंतपुरम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याबद्दल केरळमधील कॉंग्रेसच्या एका नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ए.पी. अब्दुल्लाकुट्टी यांनी लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’ची प्रशंसा केली होती.

मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याला जनतेने स्वीकारले असल्याचे या निवडणुक निकालावरून स्पष्ट होते, असे अब्दुल्लाकुट्टी यांनी फेसबुकवरच्या एका पोस्टमध्ये म्हटले होते. मोदींनी गांधींच्या तत्वांना अनुसरले हेच त्यांच्या विजयाचे रहस्य आहे, असेही अब्दुल्लाकुट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

“केपीसीसी’चे अध्यक्ष मुल्लपल्ली रामचंद्रन यांनी या पोस्टची दखल घेतली आणि अब्दुल्लाकुट्टी यांच्याकडून स्पष्टिकरण मागवले होते. त्यावर अब्दुल्लाकुट्टी यांनी उपहासाचे उत्तर दिले. याशिवाय कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबाबत त्यांनी प्रसार माध्यमांकडे अपमानजनक वक्‍तव्येही केली. ही पक्षाची शिस्त मोडण्याची कृती आहे. त्यामुळे अब्दुल्लाकुट्टी यांना तत्काळ पक्षातून हकलून देण्यात येत आहे, असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे.

अब्दुल्लाकुट्टी हे मार्क्‍सावादी कम्युनिस्ट पक्षाकडून दोनवेळेस खासदार आणि कॉंग्रेसकडून दोनवेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 मध्ये गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री असलेल्या मोदींची स्तुती केल्याबद्दलही त्यांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातून काढण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.