काँग्रेस नेत्यांकडे १२ आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई – काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याची असल्याने यासाठी काँग्रेसच्या रजनी पाटील निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी देत चुरस वाढवली आहे. अशातच आज ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी केल्याचे वृत्त होते. मात्र याबाबत आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, ‘भाजप सौदेबाजी करीत नाही’ असं सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे.

थोरात व पटोले यांनी राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली. याबाबत कोअर कमेटी, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून काय तो निर्णय घेण्यात येईल असं काँग्रेस नेत्यांना सांगितलं असल्याचं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

यावेळी आमदारांच्या निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी  मागणी काँग्रेस नेत्यांकडे केल्याचे वृत्त फेटाळताना फडणवीस यांनी, ‘यामध्ये १२ आमदारांचा विषय झाला नाही. भाजप सौदेबाजी करत नाही. काही जणांना अलीकडच्या काळामध्ये पतंग उडवायची सवय झाली आहे. त्यामुळे (१२ आमदारांचा विषय) त्यांनी उडवलेल्या पतंगी आहेत. आमचे १२ आमदार ज्यांना निलंबित केले आहे, ते नियमबाह्य आहे. त्या संदर्भात आम्ही न्यायालयात लढा देत आहोत.’ असं सांगितलं.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.