कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची तक्रार
मुंबई – कर्नाटकातील बंडखोर कॉंग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांना मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यांना भेटण्यासाठी आपल्याला पोलिसांनी अनुमती दिली नाही. आपली त्यांनी अडवणूक केल्याची तक्रार प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केली आहे. यशोमती ठाकूर या कॉंग्रेस पक्षाच्या कर्नाटकच्या प्रभारी आहेत.
भाजपने कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना मुंबईत आणून ठेवले असून त्यांच्या भोवती पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.त्यांच्यापैकी आमदार श्रीमंत पाटील यांना गुरूवारी रात्री छातीत दुखु लागल्याने त्यांना सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे आपण त्यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी तिकडे गेलो होतो त्यावेळी पोलिसांनी आपल्याला अडवले. आमदार पाटील यांचे चिरंजीव श्रीनिवासही तेथे उपस्थित होते. पण तेही मला त्यांच्या वडिलांची भेट घेण्यास राजी नव्हते असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांनी तेथे तैनात असलेल्या पोलिसांशी व रूग्णालयाच्या अधिक्षकांशी हुज्जत घातल्याचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.