नवी दिल्ली – कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल काही आठवड्यांपूर्वी चांगलेच वादंग माजले होते. तो विषय मागे पडला असताना आता पुन्हा एकदा कॉंग्रेस नेत्याची जीभ घसरली आहे. कॉंग्रेसचे नेते उदित राज यांनी आता राष्ट्रपतींबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे.
दरम्यान, उदित राज यांनी माफी मागावी अशी मागणी करतानाच कॉंग्रेसची आदिवासी समुदायाबाबत काय भावना आहे हे या प्रकारातून उघड होते, अशी टीका भारतीय जनता पार्टीने केली आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाने राज यांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
गुजरात दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी दोन दिवसांपूर्वी असे वक्तव्य केले होते की, देशातील 70 टक्के लोक गुजरातचे मीठ खातात. त्या अनुशंगाने राज यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. तसेच स्वत: मीठ खाऊन जगून दाखवा म्हणजे यांना कळेल असेही ते म्हणाले होते.दरम्यान, आपल्या प्रयत्नांनी आणि कष्टाने देशाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचलेल्या महिलेबद्दल असे शब्द वापरणे अत्यंत अपमानास्पद आहे. उदित राज यांनी माफी मागावी, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नोटीस पाठवत ट्विट केले आहे.
द्रौपदी मुर्मू यांना कोणी दुबे, तिवारी, अग्रवाल, गोयल यांनी माझ्यासारखा प्रश्न विचारला असता तर त्या पदाची अप्रतिष्ठा झाली असती. आम्ही दलित-आदिवासी टीका करणार आणि त्यांच्यासाठी लढणार पण, ते आमचेच प्रतिनिधी म्हणून तेथे पोहोचतात आणि नंतर मुके बहिरे होतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी समुदयातील असून त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र, याच समुदायाचा प्रतिनिधी असल्यामुळे आपल्यालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कृपया राष्ट्रपती पदाशी याची सांगड घातली जाऊ नये असे राज यांनी म्हटले आहे.