हरियाणात कॉंग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या

फरिदाबाद – हरियाणात कॉंग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या झाल्याचा आज धक्‍कादायक प्रकार घडला. फरिदाबाद येथे कॉंग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांना गोळ्या झाडण्यात आल्या. हा हल्ला विकास चौधरी आपल्या कारमधून प्रवास करत असताना करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विकास चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास चौधरी जीममधून बाहेर आले असता काही अज्ञातांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. विकास चौधरी आपल्या गाडीत बसले असताना त्यांच्यावर आठ ते दहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना जखमी अवस्थेत तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.
या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंदवीत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले असून सीसीटीव्हीतील फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून काढण्यात येईल, अशी माहिती एएसपी जयवीर राठी यांनी दिली.

हल्लेखोर नेमके कोण होते याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. हरियाणाचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी सध्या राज्यात जंगलराज असल्याची टीका केली. सध्या जंगलराज सुरु आहे. कायद्याची कोणतीही भीती नाही. अशीच घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. जेव्हा छेडछाडीला विरोध केल्याबद्दल महिलेची हत्या करण्यात करण्यात आली होती. यासंबंधी तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.