कॉंग्रेसचे नेते शकील अहमद यांची पक्षातून हकालपट्टी

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसने पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्यावर कठोर कारवाई केली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी प्रवक्ते शकील अहमद यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या अहमद यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.

बिहारमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने आघाडी केली आहे. त्यामुळे जागावाटपात कॉंग्रेसला फटका बसला. काही जागा राजदला गेल्याने अनेक नेते नाराज झाले. शकील अहमद यांना मधूबनी मतदार संघातून उमेदवारी हवी होती. मात्र ती न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

बिहार प्रदेश कॉंग्रेस समितीने त्याचा अहवाल दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे पाठविल्याने कॉंग्रेस कार्यसमितीने ही कारवाई केली. कॉंग्रेसमधले दिग्गज मुस्लिम नेते अशी शकील अहमद यांची ओळख आहे. हकालपट्टी करतानाच त्यांचे पक्षाचे सदस्यत्वही रद्‌द करण्यात आले आहे.

शकील अहमद यांच्यावरच्या कारवाईने राहुल गांधी यांनी बंडखोरांना कडक संदेश दिल्याचे बोलले जात आहे. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी ठरवले असल्याची माहिती कॉंग्रेसमधल्या सूत्रांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.