लखनोै – उत्तरप्रदेशातील कॉंग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी आज पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने या राज्यात कॉंग्रेसला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, प्रदेश प्रभारी धमेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांना भाजप तर्फे पडरोैना मतदार संघातून भाजपची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी आरपीएन सिंह यांनी सांगितले की, मी 32 वर्ष कॉंग्रेसची सेवा केली पण कॉंग्रेस हा आता एक पक्ष राहिलेला नाही, त्यामुळे राष्ट्रनिर्माणाची क्षमता असलेल्या मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षात आपले योगदान देणे महत्वाचे आहे, हे लक्षात आल्याने आपण हा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले.