नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापासून दूर राहण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेत व्यस्त असल्याने राहुल यांचा अधिवेशनातील सहभाग अनिश्चित आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर, यात्रेत सहभागी कॉंग्रेसचे खासदार अधिवेशनाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना विचारला.
त्यावर यात्रेत प्रारंभीपासून सहभागी असणारे राहुल, दिग्विजय सिंह, के.सी.वेणुगोपाल आदी नेते अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे उत्तर त्यांनी दिले. संबंधित नेते अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती यांच्यापर्यंत पोहोचवतील, अशी पुस्तीही रमेश यांनी जोडली.
संसद अधिवेशनाचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. ते अधिवेशन 7 ते 29 डिसेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. मात्र, यात्रेमुळे यावेळी राहुल त्या अधिवेशनाला मुकण्याची चिन्हे आहेत.