वाजपेयींचे सरकार महाभेसळच होते
नवी दिल्ली -विरोधकांच्या एकीला महाभेसळ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहासाचे विस्मरण झाले आहे. कॉंग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. महाआघाडीचे नेतृत्व करून तीन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचे नेतृत्व केले होते का, असा सवाल कॉंग्रेस नेते मनीष तिवारींनी उपस्थित केला.
छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवरही टीका केली. 40-42 पक्षांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्त्व करणारे मोदीच महाभेसळीचे म्होरके आहेत, असे तिवारी म्हणाले.
दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारचा संदर्भ देत कॉंग्रेसने मोदींवर तोफ डागली. 1996, 1998 आणि 1999 मध्ये महाआघाडीचे सरकार चालवणारे अटलबिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचं नेतृत्व केलं होतं का? असा प्रश्न तिवारींनी उपस्थित केला. आज वाजपेयींचा अंतरात्मा रडत असेल. त्यांचे सरकार महाभेसळीचं सरकार होते का, असा प्रश्न आम्ही विचारू इच्छितो. या प्रश्नाचे उत्तर मोदींनी द्यावे, असे तिवारी म्हणाले.
मोदींवर हल्लाबोल करताना मनीष तिवारींनी इतिहासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, या देशात आघाडी सरकारची प्रक्रिया कोणी सुरू केली? व्ही. पी. सिंग यांना कोणी पाठिंबा दिला? 1996 मध्ये 13 दिवसांचे सरकार कोणाच्या समर्थनामुळे स्थापन झाले? आघाडी महाभेसळ आहे, असे मोदी म्हणतात. मग एनडीएमध्ये इतर पक्ष नाहीत का? मोदी एनडीएचे नेतृत्व करतात. एनडीएमध्ये 40-42 पक्ष आहेत. त्यामुळे मोदी महाभेसळीचे म्होरके ठरतात, अशा शब्दांमध्ये तिवारींनी मोदींचा समाचार घेतला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा