अहमदाबाद – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री माधवसिंह सोळंकी यांचे आज सकाळी गांधीनगर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले ते 93 वर्षांचे होते. सोळंकी हे चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या सह अन्य अनेक नेत्यांनी तीव्र दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सोळंकी यांनी केंद्रातही कार्यभार सांभाळला आहे. ते जून 1991 ते मार्च 1992 या काळात देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. नरेंद्र मोदींच्या आधी ते गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भोगलेले नेते होते. त्यांचे पुत्र भरतसिंह सोळंकी हेही माजी केंद्रीय मंत्री आहेत.
गुजरात मधील ते एक लोकप्रिय कॉंग्रेस नेते होते. त्यांनी त्यावेळी खाम ही राजकीय नीती बनवली होती. त्यात क्षत्रिय, हरिजन, अदिवासी आणि मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन एक नवीन राजकीय समिकरण राज्यात बनवले होते. त्या आधारे त्यांनी मोठे राजकीय यश मिळवले होते.
1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 182 पैकी 149 जागा जिंकल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे की त्यांनी कॉंग्रेस पक्षाला मजबूती देण्यासाठी मोठे कष्ट घेतले तसेच त्यांची सामाजिक न्यायाची भूमिकाही सदैव स्मरणात राहील