कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

हैदराबाद – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात त्यांनी रविवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्‍चात्य दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंबीय आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते निमोनिया आजाराने त्रस्त होते. त्यांना गेल्या आठवड्यात उपचारासाठी दिल्लीच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून ते न्युमोनिया रोगाने त्रस्त होते. त्यामुळेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच खालाविली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र ते अयशस्वी ठरले. त्यांच्यावर उद्या, सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 रोजी तेलंगण येथील माडगूळ गावात झाला होता. एक धडाडीचे कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. मात्र 1975 मध्ये आणीबाणी लागू केल्याने त्यांनी कॉंग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनता दलात गेले. 1980मध्ये त्यांनी मेडक लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. तसेच 1985 ते 1988 या काळ ते जनता दलाचे सरचिटणीस होते.

जयपाल रेड्डी चार वेळा आमदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच दोन वेळा ते राज्यसभेचे सदस्यही होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते कॅबिनेट मंत्री होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री होते. त्यापूर्वी 1998मध्ये पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. 1999ला जवळपास 21 वर्षांनंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये पुन्हा वापसी केली. त्यानंतर यूपीएच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्वपक्षिय नेत्यांनी शोक व्यक्‍त केला आहे. तसेच या दु:खद क्षणी त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रपरिवाराला ताकद मिळो, असे ट्‌वीट कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.