मुंबई – मागील आठ महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली बहुचर्चित करोना लस शनिवारी देण्यास सुरुवात करण्यात आली. भारतात पहिल्याच दिवशी सुमारे २ लाख लोकांना लस दिल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईतील लसीकरण शनिवारी अर्ध्यातच थांबविण्यात आले. यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
कोविन ॲपमध्ये शनिवारी संध्याकाळी उशिरा तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेला लसीकरण मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली आहे. त्यामुळे ही समस्या दूर होईपर्यंत १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केले. लसीकरण स्थगित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्धघावटनाच्या फोटोशूटवरून निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र में वैक्सिनेशन का काम रोक दिया गया है।
तकनीकी कारण बताया जा रहा है।
कल फोटो-औप की होड़ लगी थी।
वैक्सीन कर्मचारियों ने लगवाए, फोटो मुख्यमंत्री और मंत्री लोग खिंचवाए।
बजाय इसके प्रोसेस और वैक्सीन को दुरुस्त करने पर ध्यान देते तो किरकिरी नहीं होती।#COVIDVaccination— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 17, 2021
कोरोनाच्या लसीकरणाचे उद्धाटन करताना फोटो काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा लागली होती. राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मात्र, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वत:चे फोटो काढून घेतले. त्यामुळे फोटोशूट करण्यापेक्षा लसीकरणाची प्रोसेस आणि झालेली तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर दोन दिवसांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम थांबला नसता, असा खोचक टोला संजय निरुपम यांनी लगावला आहे.
कोरोना लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. शनिवारी तांत्रिक अडचण आल्याने ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मुंबईत रविवार १७ जानेवारी आणि सोमवार १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्यात येणार आहे. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.