नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या दिल्ली न्याय यात्रेचा प्रारंभ शुक्रवारपासून झाला. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन कॉंग्रेसने ती यात्रा सुरू केली आहे. त्यामागे विविध मुद्द्यांवरून दिल्लीतील आप सरकारवर दबाव टाकण्याचा उद्देश आहे.
दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष देवेंदर यादव, ज्येष्ठ नेते अजय माकन, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुखू यात्रेत सहभागी झाले. कॉंग्रेसची यात्रा महिनाभर चालणार आहे. यात्रेदरम्यान पक्षाचे नेते, कार्यकर्ते दिल्लीकरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रांच्या धर्तीवर दिल्लीतही यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या यात्रेची सांगता ४ डिसेंबरला होईल. दिल्लीत वेळापत्रकानुसार पुढील वर्षीच्या फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी आता अवघ्या ३ ते ४ महिन्यांचा अवधी बाकी आहे.
त्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे. त्या तयारीचा भाग म्हणून यात्रेकडे पाहिले जात आहे. कॉंग्रेस आणि दिल्लीत सत्तेवर असणारा आप हे पक्ष राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या इंडिया आघाडीचे घटक आहेत. मात्र, दिल्लीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.