येडियुरप्पांच्या सत्तास्थापनेवर कॉंग्रेस, जेडीएसची टीका

भाजपने लोकशाहीचा खाटिकखाना केला

बंगलुरू – भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात सरकार स्थापनेचा जो दावा केला आहे त्यावर कॉंग्रेस आणि जेडीएसने जोरदार टीका केली आहे. कर्नाटकात लोकशाहीचा खाटिकखाना करून घटनाबाह्यरित्या हे सरकार सत्तेवर आले आहे असे त्यांनी म्हटले आहे. आमदारांच्या घोडेबाजारासाठी सर्व शक्‍य ते मार्ग चोखाळून राज्यात लोकशाही बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी येडियुरप्पा यांना बहुमताची कोणतीही खात्री करून न घेता सरकार स्थापनेसाठी जे आमंत्रण दिले आहे तेही लोकशाही विरोधी आहे. येडियुरप्पांचा उल्लेख जेलबर्ड असा करून जेडीएस पक्षाने म्हटले आहे की येडियुरप्पा हे भ्रष्टाचाराचे आयकॉन आहेत. सन 2008 ते 2011 या काळातील येडियुरप्पांची विनाशकारी राजवट अजून लोक विसरलेले नाहीत. कॉंग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी म्हटले आहे की भाजपने कर्नाटक राज्याला राजकारणाची प्रयोगशाळा बनवली असून येथे भाजपपुरस्कृत राज्यपालांनी घटनेची पुर्ण पायमल्ली करून येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.

येडियुरप्पांच्या मागे बहुमत आहे की नाही याची खातरजमा करून घेणे ही राज्यपालांची जबाबदारी होती. पण ती त्यांनीही पाळली नाही. आजही भाजपच्या मागे केवळ 105 आमदार आहेत सभागृहाची एकूण क्षमता लक्षात घेता हा बहुमताचा आकडा नाही असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना टॅग करीत एक संदेश प्रसारीत केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की मागे स्पष्ट बहुमत नसताना येडियुरप्पांना सरकार स्थापनेचा दावा करण्याची अनुमती आपण कशी दिली? कायद्याचे राज्य कोठे आहे असा सवालही कॉंग्रेसने मोदींना उद्देशून केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)