गेहलोतविरोधी भूमिकेची गंभीर दखल
नवी दिल्ली: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात एका आमदाराने घेतलेल्या भूमिकेची गंभीर दखल कॉंग्रेसने घेतली. त्यानुसार संबंधित आमदाराला पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली.
राजस्थानात सत्तेत असूनही कॉंग्रेसला त्या राज्यात लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसमध्ये धुसफूस वाढीस लागली आहे. त्या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारण्यावरून ब्लेमगेम सुरू झाल्याचे चित्र आहे. अशातच पक्षाचे आमदार पृथ्वीराज मीना यांनी थेट गेहलोत यांना लक्ष्य केले.
कॉंग्रेसच्या पीछेहाटीची जबाबदारी गेहलोत यांनी स्वीकारावी. एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची निवड करावी, अशी मागणीवजा भूमिका त्यांनी मांडली. देशभरातील नामुष्कीजनक पीछेहाटीमुळे आधीच अस्वस्थ असलेल्या कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला ती भूमिका रूचली नाही. त्यातून मीना यांना नोटीस बजावण्यात आली. त्याशिवाय, पक्षाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचवणारी वक्तव्ये प्रसारमाध्यमांपुढे किंवा सोशल मीडियातून करू नयेत, असा इशाराही इतर नेत्यांना देण्यात आला आहे.