अजमेर – कॉंग्रेस सरकार 100 पैसे पाठवते तर त्यातील 85 पैसे भ्रष्टाचारातच जातात अशी कबुली खुद्द कॉंग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिली होती. कॉंग्रेस प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन खाणारा पक्ष आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथील सभेत केली.
मोदी म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या सरकरने नऊ वर्षे पूर्ण केली आहेत आणि ही वर्षे देशवासियांची सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित राहीली आहेत. कॉंग्रेस पक्षाने 50 वर्षांपूर्वी देशातील गरिबी हटवण्याचे आश्वासन गरिबांना दिले होते. मात्र तसे त्यांनी केले नाही. गरिबांशी केलेला हा सगळ्यांत मोठा विश्वासघात होता. गरिबांना भ्रमित करा, त्यांना अगतिक करा हेच कॉंग्रेसचे धोरण राहीले आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांचा लहान शेतकऱ्यांनाही फटका बसला.
जेंव्हा लूटीचा विषय येतो तेंव्हा मात्र कॉंग्रेस कोणता भेदभाव करत नाही. गरिब, दलित, पीडित, शोषित, वंचित, आदिवासी आणि अल्पसंख्याक अशा सगळ्यांना कॉंग्रेस एकसमान पध्दतीने लूटते अशी गंभीर टीका करत मोदींनी राजस्थानातील कॉंग्रेस सरकारलाही यावेळी लक्ष्य केले. हमी देण्याची कॉंग्रेसची जुनीच सवय असल्याचे नमूद करत ते म्हणाले की कॉंग्रेसच्या सरकारच्या काळात पंतप्रधानांच्या वरही सुपर पॉवर होती. देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आज संपूर्ण जगात भारताचे गुणगान होते आहे.
2014 पूर्वी आपल्याकडे काय स्थिती होती. भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभर लोक रस्त्यावर उतरले होते. कॉंग्रेस सरकार सीमेवर रस्ते बनवायला घाबरत होते. मोठ्या शहरांत दहशतवादी हल्ले होत होते. पंतप्रधानांच्या वर एक शक्ती कार्यरत होती आणि कॉंग्रेसचे सरकार रिमोट कंट्रोलवर चालत होते अशा शब्दांत कॉंग्रेसला लक्ष्य करत पंतप्रधानांनी एकप्रकारे राजस्थान विधनासभा निवडणुकीचा बिगूल फुंकल्याचे मानले जाते आहे.