नवी दिल्ली – कन्हैयाकुमार यांना भाजपने नेहमी तुकडे तुकडे गॅंगचे नेते म्हणून संबोधले आहे. तथापि आज त्या मुद्द्यावरून भाजपचा समाचार घेताना कन्हैयाकुमार यांनी म्हटले आहे की, ते मला तुकडे तुकडे गॅंगचा नेता समजत असले ती मी त्यांचे तुकडे तुकडे करू शकतो.एका दूरचित्रवाणीवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देशात भाजपला कॉंग्रेस हाच समर्थ पर्याय आहे असा दावा करून ते म्हणाले की, आज देशात विरोधी पक्षात जे काही पक्ष आहेत ते सारे प्रादेशिक पक्ष आहेत आणि भाजपच्या विरोधातला एकमेव राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेस हाच आहे असे त्यांनी नमूद केले. भाजपला पराभूत करण्याची क्षमता कॉंग्रेसकडेच आहे आणि हे काम कॉंग्रेस निश्चीत करू शकेल.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ते म्हणाले की, राहुल गांधी हे दुसऱ्याविषयी मनात कायम अनुकंपा बाळगणारे नेते आहेत. मी या आधी त्यांना अनेक वेळा भेटलो आहे. त्या प्रत्येकवेळी त्यांनी माझ्या आई वडिलांच्या प्रकृतीची कौतुकाने चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या या गुणांमुळे मी त्यांच्याकडे आकृष्ट झालो असेही त्यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा उल्लेख त्यांनी नथरामने बनाई जोडी असा केला. भाजपची विचारधारा थेट महात्मा गांधींच्या विरोधातली आहे. त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे त्यांना नेहमीच वंदनीय वाटत आला आहे. भाजपला गोडसे हा राष्ट्रपिता वाटतो, ते गांधींना राष्ट्रपिता मानायला तयार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली.