नगर – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये या निवडणुका होतील, असे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छीणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 जागावरील इच्छुकांना अर्ज मागितले आहे.
राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होत आहे. प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी पालकमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार आणि निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया प्रदेश पातळीवर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जमा करावेत हे उमेदवारी अर्ज पक्ष निधीच्या डी डी स्वरूपात जमा करून त्या पावती सह ते प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येतील असे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन आणि संघटन विभागाचे नाना गावंडे यांच्या सहीनीशी जिल्हाध्यक्षांना हे पत्र देण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी जिल्हा अध्यक्षांच्या मार्फत (दि.१०) ऑगस्ट पूर्वी आपले अर्ज करावे. त्यासोबत सर्वसाधारण वर्गासाठी वीस हजार रुपये आणि अनुसूचित जाती जमाती महिला उमेदवारांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये पक्ष निधी डीडी स्वरूपात जमा करावा, असे नमूद करण्यात आले आहे.