कॉंग्रेसने मतदारांचा अवमान केला – राज्यसभेत मोदींचा पलटवार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लोकांनी प्रचंड बहुमताने विजयी केले. पण भाजपच्या विजयावरच प्रश्‍न चिन्ह उपस्थित करून कॉंग्रेसने मतदारांचा अवमान केला आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसवर पलटवार केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की भाजप जिंकली पण देश हारला अशी टीका या चर्चेच्यावेळी बोलताना कॉंग्रेसच्या सदस्यांनी केली. पण कॉंग्रेस म्हणजे देश आहे काय आणि देश म्हणजे केवळ कॉंग्रेस आहे काय. या अहंकाराला काही मर्यादा हवी. एखादा राजकीय पक्ष इतका अहंकारी कसा असू शकतो असा सवाल त्यांनी केला. कॉंग्रेसच्या अशा प्रकारच्या भाषेमुळे मतदार दुखावला गेला आहे.

वायनाड आणि रायबरेलीतील कॉंग्रेसचा विजय ही सुद्धा देशाची हार आहे काय असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आपल्या संकुचित राजकीय मानसिकतेतून काही लोक लोकांनी दिलेला कौलही मानायला तयार नाहीत. हा लोकशाहींचा अवमान असून लोकशाहींचा इतका मोठा अवमान या आधी कधीच झाला नाही असेही त्यांनी नमूद केले.

कॉंग्रेसला सतरा राज्यात एकही जागा जिंकता आली नाही या पराभवाचे कॉंग्रेसने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत वापरल्या गेलेल्या ईव्हीएम मशीन बाबतही शंका घेतली आहे. वास्तविक ईव्हीएम मशिनला साऱ्या जगात वाखाणले गेले असताना त्यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा निंदनीय प्रयत्न केला आहे असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी यावेळी बोलताना देशातील अनेक समस्यांचा आपण एकत्रितपणे मुकाबला केला पाहिजे असेही आवाहन केले. झारखंड सारख्या राज्यात एका व्यक्तीला सामुहिक मारहाण करून ठार मारण्यात आल्याची निदंनीय घटना घडली आहे. याचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्हीही आहोत पण अशा एखाद दुसऱ्या घटनांमुळे साऱ्या राज्याला दोषी ठरवणे योग्य आहे काय असा सवाल त्यांनी केला. देशात भीषण पाणी संकट आहे याची सरकारला जाणीव आहे त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमच्या सरकारने एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले असून त्याद्वारे योग्य ते प्रयत्न केले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.