कलम 370 लादून कॉंग्रेसने जम्मू काश्‍मीरवर अन्याय केला

हरियानातील प्रचार सभेत मोदींची पुन्हा टीका

ऐलेनाबाद (सीरसा) – कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे नुकसान झाले. त्यांनी कलम 370 लादून जम्मू काश्‍मीरवर सातत्याने अन्याय केला. कलम 370 ही तात्पुरती व्यवस्था होती पण त्याबाबत कॉंग्रेसने गेल्या 70 वर्षात काहीहीं केले नाही असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना केला.

ते म्हणाले की तुम्ही मला पंतप्रधानपदावर पर्मनंट केले आहे त्यामुळे मी असल्या टेम्पररी बाबी चालू देणार नाही. कलम 370 ही तरतूद टेम्पररी स्वरूपाची होती. मग ती इतकी वर्ष चालू का ठेवली गेली असा सवालही त्यांनी केला. काश्‍मीर खोऱ्यातून चार लाख काश्‍मीरी पंडितांना याच काळात विस्थपित व्हावे लागले असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. कर्तारपुर कॉरिडॉरचा विषय 70 वर्ष प्रलंबीत ठेवल्याबद्दलही त्यांनी कॉंग्रेस सरकारवर टीका केली.

ते म्हणाले की आत्तापर्यंत भारतीय सीमेवरून पाकिस्तानी हद्दीत असलेल्या कर्तारपुर साहिब गुरूद्वाराचे केवळ दुर्बिणीच्या आधारेच दर्शन घेता येत होते. पण आता हा कॉरिडॉर सुरू झाल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन दर्शन घेण्याचा लाभ लोकांना मिळेल असे ते म्हणाले. मुळात हा गुरूद्वारा पाकिस्तानी हद्दीत गेल्याबद्दलही त्यांनी कॉंग्रेसला दोष दिला. फाळणीच्यावेळी हा गुरूद्वारा भारतीय हद्दीत त्यांना का आणता आला नाही असा सवालही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.