लक्षवेधी – कार्यकर्त्यांना एकनिष्ठ ठेवण्याचे कॉंग्रेसपुढे आव्हान 

हेमंत देसाई 

सतराव्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली. कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ते ठाम आहेत. त्यातच कॉंग्रेसमधील गळती थांबवून कार्यकर्त्यांना एकनिष्ठ ठेवण्याचे आव्हानही कॉंग्रेस पुढे आहे. 

लोकसभा निवडणुकांमध्ये वाताहत झाल्यानंतर, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदत्याग करण्याचा मनोदय जाहीर केला आणि त्यावर ते अद्याप ठाम आहेत. पक्षाच्या अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या शिरावर घेतली, ही योग्यच गोष्ट झाली. वास्तविक पराभव झाला, तर त्याची सामूहिक जबाबदारी पक्षाच्या सर्व नेत्यांची आणि विजय झाला, तर त्याचे श्रेय मात्र नेहरू-गांधी घराण्याचे, असे मानण्याची कॉंग्रेस संस्कृती आहे. ही संस्कृती बदलण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असले, तर ती स्वागतार्ह बाब आहे. पराभव झाला असला, तरी आमचे 52 खासदार संसदेतील लढाई जिगरीने लढतील, असा निर्धार राहुल यांनी व्यक्‍त केला. सैन्याची पळापळ होऊ नये म्हणून नेत्याने जसे बोलायला हवे, तसेच राहुल गांधी बोलले. परंतु त्यानंतर ते फक्‍त वायनाड या आपल्या मतदारसंघात फिरकले. तेथे त्यांना बघण्यासाठी तुडुंब गर्दी झाली. त्यामुळे त्यांच्या निराश मनात थोडा आल्हाद निर्माण झाला. मात्र पराभवानंतर दिल्ली, मुंबई अथवा लखनौ येथे सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन जंगी सभा घ्यायची आणि आपला संघर्ष सुरू राहील याची ग्वाही द्यायची, हे काही राहुलजींनी केले नाही. ज्या पक्षात अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारायचा का नाही, याचाच निर्णय दिवसेंदिवस होत नाही, त्या पक्षावर लोक भरवसा कसा ठेवतील?

महाराष्ट्रात तर कॉंग्रेसच्या वाट्याला लोकसभेची एकच जागा आली. हा विजयी उमेदवारदेखील शिवसेनेतून आयात करण्यात आलेला आहे. असे असून देखील, राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास, राज्यातील काही जिल्हाध्यक्षांचा विरोध आहे, असे जाहीर वक्‍तव्य प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. त्यानंतर, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ पत्रकारांनी काढला, असेही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची बी टीम आहे, असा ज्या कॉंग्रेसने आरोप केला, त्यांच्याबरोबरच आघाडी करण्यास आम्ही उत्सुक आहोत, अशीही वक्‍तव्ये काही कॉंग्रेस नेत्यांनी केली. ऐन निवडणुकीच्या वेळीच अशोकरावांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा असल्याचे सूचित केले होते. परंतु प्रत्यक्षात राज्यात पक्षाचा अक्षरशः निकाल लागूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात हाणामाऱ्या सुरू आहेत. कर्नाटकातही कॉंग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळून येत असते. आणि काही आमदार केव्हाही भाजपात जाऊ शकतात. कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यातही खडाखडी सुरू आहे. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात तीव्र मतभेद आहेत. गहलोत तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरुद्धची नाराजी राहुलजींनी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्‍त केली.

या पार्श्‍वभूमीवर, कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी परिस्थिती आणखीनच बिकट करून ठेवली आहे. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या प्रचाराचा निवडणूक निकालाच्या दृष्टीने काहीएक उपयोग झाला नाही. त्यांच्या प्रचारयात्रेस गर्दी होत असल्यामुळे आणि त्यांच्या प्रसन्न व्यक्‍तिमत्त्वामुळे तसेच जनतेशी त्या ज्या पद्धतीने संवाद साधत होत्या, त्यामुळे आशा निर्माण झाली होती. मात्र, निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाल्यानंतर अनेकजण राहुलजींवरच त्याचे खापर फोडतील, म्हणून प्रियांका यांनी पक्ष कार्यकर्त्यांवर त्याचे खापर फोडले आहे. अमेठी व उत्तर प्रदेशातील अन्य भागांमध्ये कॉंग्रेसचा बोऱ्या वाजला. कोणकोणत्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम एकनिष्ठेने केले नाही, ते मी तपासणार आहे, असे प्रियांकाने सांगितले आहे. उत्तम व्यवस्थापनाचे पहिले तत्त्व हे आहे की, अपयशाची जबाबदारी प्रथम नेत्याने घ्यायची असते. ज्या पक्षातील अनेक नेतेही सत्ताधारी भाजपात जात आहेत, त्या पक्षाने कार्यकर्त्यांनाही दुखावले, तर पक्षाचे भवितव्य कठीणच आहे.

तेलंगणात कॉंग्रेसच्या 18 पैकी 12 आमदार के. सी. चंद्रशेखर राव यांना जाऊन मिळाले आहेत आणि एवढे असूनही, राहुलजी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांना भेटण्यास, त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नव्हते, हे भयंकरच म्हणावे लागेल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आपल्या निवडून आलेल्या मुलासमवेत राहुलजींना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी त्यांना भेट नाकारली. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ताबडतोब भेटले. अशोक गहलोत, कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांनी फक्‍त आपापल्या मुलांचे हित बघितले आणि निवडणुकीत पक्षाच्या हिताकडे मात्र लक्ष दिले नाही, असे राहुलजींचे मत आहे. त्यांच्या म्हणण्यात जरूर तथ्य आहे; परंतु आज अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना, सर्व नेत्यांना सांभाळून घेऊनच पुढे गेले पाहिजे.

सचिन पायलट हे राजस्थानचे प्रदेशाध्यक्षही आहेत. तेव्हा आपला मुलगा वैभव यास जोधपूरमधून निवडून आणण्याची जबाबदारी पायलट यांची होती, असे गहलोत यांचे मत आहे. वैभव 2 लाख 70 हजार मतांनी आडवा झाला. जो मुख्यमंत्री आपल्या मुलालादेखील निवडून आणू शकत नाही आणि त्याचे खापर दुसऱ्यावर फोडतो, त्या पक्षाचे भवितव्य कठीणच आहे. राजस्थानात एकही जागा गहलोत निवडून आणू शकले नाहीत, तेव्हा त्यांना हाकलून पायलट यांना नेमा, अशी पायलट यांच्या समर्थकांची मागणी आहे. सिद्धूवर कारवाई करा, कारण ते सतत माझ्यावरच जाहीर टीका करत असतात, ही अमरिंदर सिंग यांची मागणी राहुलजींनी पूर्ण केलेली नाही.

हरियाणात तर कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी जवळजवळ एकमेकाला ठोसे लगावण्याचेच काय ते बाकी ठेवले होते. मध्य प्रदेशात गुणा मतदारसंघात पराभव झाल्यामुळे ज्योतिरादित्य सिंदिया त्रासले आहेत. भोपाळमधून दिग्विजयसिंग यांचा निकाल लागला. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून कमलनाथ यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी ज्योतिरादित्य व दिग्विजय यांनी केली आहे. मुळात कमलनाथांचे सरकारच धोक्‍यात आलेले आहे. राहुलजींनी आपल्याच ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली, तेव्हा त्यांना कामराज योजना-2 लागू करण्याची इच्छा होती.

1960च्या दशकात कॉंग्रेसचे अध्यक्ष कामराज यांनी मंत्रिमंडळ व पक्षातील अनेकांना बाजूला करण्याची योजना राबवली होती. परंतु राहुलजींचे हे प्रयत्नही असफल ठरले आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर, राहुल गांधी यांनी तातडीने नेतृत्वबदलाची प्रक्रिया गतिमान करावी आणि प्रियांकाने सरचिटणीस म्हणून देशात कॉंग्रेस पक्ष कसा वाढेल, यासाठी कामाला लागावे. जोपर्यंत नेता सातत्याने व चिकाटीने काम करत नाही व रिझल्ट देत नाही, तोपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांत त्याला सन्मान मिळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.