नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांमध्ये सोनिया, राहूल आणि प्रियांका गांधी यांच्यासह नवज्योतसिंग सिध्दू आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे राजीनामा दिलेल्या सिध्दू यांच्या नियुक्तीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही कॉंग्रेस निवडणूक प्रचारासाठी उतरवणार असल्याचे प्रचारकांच्या यादीवरून स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग, भूपेश बाघेल, अशोक गेलहोत, कमलनाथ, व्ही. नारायणसामी यांचाही समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे. या शिवाय राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, खुशबु सुंदर आणि नगमा मोरारजी या चित्रपट कलाववंतांचाही समावेश करण्यात आला आहे.
गुलाम नबी आझाद, नदीम जावेद, कीर्ती आझाद, रागिणी नायक यांनाही या यादीत स्थान दिले आहे. सचिन पायलट, ज्योतीरादित्य शिंदे आणि रणजीतसिंग सुरजेवाला या युवा नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभेच्या 66 मतदारसंघात कॉंग्रेसने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गेल्या विधानसभेत एकही सदस्य नसणारी कॉंग्रेस येथे पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. शीला दिक्षित यांच्या काळातील 15 वर्षांच्या कामगिरीवर कॉंग्रेसचा प्रचारात जोपर असेल, असा रागरंग आहे.