कराडमध्ये कॉंग्रेसला मोठे खिंडार

कॉंग्रेसच्या दिग्गजांचा मुंबईत भाजपात प्रवेश, पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर यांना धक्का

कराड –
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक आ. आनंदराव पाटील यांनी कोंडाळ्यांच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी फारकत घेण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आज सोमवारी पाटील यांचे पुत्र व कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह पाटील तसेच कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक सुनील पाटील यांच्यासह कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कराडमधील कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कराडला होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कराड दक्षिण व कराड उत्तरच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. सोमवारी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या, सुरजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, ना. डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत सुनील पाटील व प्रतापसिंह पाटील यांचा जाहीर प्रवेश झाला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “”पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्यांच्या जीवावर आत्तापर्यंत राजकारण केले, असे सर्व जण आज भाजपमध्ये आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर नाराज होऊन आणि भाजपच्या विकास कार्याने प्रभावित होऊन ते आले आहेत.” पक्षात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, त्यांना योग्य त्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुनील पाटील म्हणाले, “”आमच्या कुटुंबाने गेली 40 वर्षे कॉंग्रेसची निष्ठेने सेवा केली. पण गेल्या अनेक महिन्यांपासून मात्र आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जाऊ लागले. या प्रवृत्तीला कंटाळून आज शेकडो कार्यकर्त्यासह भाजपमध्ये सहभागी झालो आहोत.”

पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण आम्हाला मात्र हीन भावना मिळू लागल्याने शेवटी भाजपत सहभागी होण्याची निर्णय घेतला. येत्या निवडणुकीत आमच्या गटाची संपूर्ण ताकद अतुल भोसले यांच्या पाठीशी लावू, असा विश्‍वास आर. टी. स्वामी यांनी व्यक्त केला.

यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर. टी. स्वामी, संतकृपा उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव भावके, विंगचे माजी सरपंच वसंतराव शिंदे, विजयनगरचे सरपंच सचिन मोहिते, उपसरपंच विश्‍वास पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे तर विलासराव पाटील- उंडाळकर गटाच्या उंडाळेच्या उपसरपंच अनुसया शेवाळे, गोवरेचे माजी उपसरपंच निसार मुल्ला, माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी, गोवारे सोसायटीचे चेअरमन सतीश पवार, गोवारे ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, रशीद मुल्ला, मुंढेचे उपसरपंच भीमराव जमाले, पवारवाडीचे सरपंच लक्ष्मण धोत्रे, नितीन पाटील, विकास कुंभार, अभिजित पवार, रमेश जगताप, अवधूत डुबल, सागर डुबल, अर्जुन हुबाले, आशिष माने, अमोल चव्हाण, प्रशांत चव्हाण, सचिन पवार, दिलीप पवार, डॉ. प्रकाश पाटील, चंद्रकांत शेवाळे, सुनील जाधव, कुलदीप निकम, मारुती शेवाळे, उत्तमराव साळुंखे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रताप पाटील यांना भोवळ
आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रतापसिंह पाटील आपली भूमिका मांडताना म्हणाले, “”आमच्या कुटुंबाने निष्ठेने कॉंग्रेसची 40 वर्षे सेवा केली. पण गेली दोन वर्षे आम्हाला चुकीची वागणूक मिळू लागली.” पुढे ते आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचणार, तोच त्यांना अस्वस्थ वाटून अचानक भोवळ आल्याने ते स्टेजवरच कोसळले. त्यांना तातडीने कार्यकर्त्यानी शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.

डॉक्‍टरांच्या उपचाराने ते शुद्धीवर आल्यानंतर ते पुन्हा कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, “म्हाडा’चे संचालक मोहनराव जाधव, संजय शेटे, पंकज पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)