पुदुच्चेरीत कॉंग्रेससमोर पेचप्रसंग ! आणखी एका आमदाराचा राजीनामा; आघाडीचे सरकार अल्पमतात

पुदुच्चेरी – देशात 5 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या सत्ताधाऱ्यांपुढे भाजपकडून वेळोवेळी आव्हाने उभी केली गेली आहेत. आता देखील कॉंग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला असून पुदुच्चेरीमधील कॉंग्रेसचे सरकार पडण्याच्या स्थितीवर येऊन ठेपले आहे.

पुदुच्चेरीमधल्या अजून एका आमदाराने राजीनामा दिल्यामुळे आता कॉंग्रेसचं सरकार अल्पमतात आले असून विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपकडून अपेक्षेप्रमाणे फ्लोअर टेस्ट अर्थात बहुमत चाचणीची मागणी केली गेली आहे.

विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या पुदुच्चेरी दौऱ्याच्या आधीच अशा प्रकारे कॉंग्रेससमोर राजकीय पेच निर्माण झाल्यामुळे आता राहुल गांधींच्या दौऱ्यामध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.
पुदुच्चेरीमध्ये कॉंग्रेस आणि द्रमुक यांच्या आघाडीचे सरकार आहे.

आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या 3 आमदारांनी राजीनामे दिले असून आता ए जॉन कुमार यांनी देखील विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. सिवकोलुंथू यांच्याकडे सभागृह सदस्यपदाचा राजीनामा सोपवला आहे. याआधी ए. नामासिवायम आणि मल्लाडी कृष्ण राव हे दोन मंत्री आणि ई थीप्पैथन या आमदाराने राजीनामा दिला आहे.

तसेच एन. धनवेलू यांना पक्षविरोधी कारवायांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 33 आमदारांच्या पुदुच्चेरी विधानसभेमध्ये आता कॉंग्रेस-द्रमुक आघाडीचे 14, तर भाजप-अद्रमुक आघाडीचे देखील 14 आमदार राहिले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या 14 आमदारांमध्ये 10 कॉंग्रेस, 3 द्रमुक आणि 1 अपक्ष आमदाराचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजप-अद्रमुक आघाडीमध्ये 3 भाजप, 7 एनआर कॉंग्रेस आणि 4 अद्रमुकचे आमदार आहेत.

दरम्यान, येत्या मे महिन्यामध्ये पुदुच्चेरीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राजीनाम्यांनंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा आणि या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या पुदुच्चेरी भेटीचा काय परिणाम या निवडणुकांवर होईल, याविषयी राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.