कॉंग्रेस स्थापना दिवस : अशी झाली कॉंग्रेसची स्थापना

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना ए. ओ. ह्यूम या निवृत्त ब्रिटीश सनदी अधिकाऱ्याने केली असली तरी कॉंग्रेसच्या स्थापनेचे संपूर्ण श्रेय ह्यूम यांनाच जात नाही.

कारण कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वी भारतातील अनेक भागात स्वातंत्र्यासाठी अनेक उद्रेक झाल्याचे आढळतात. ब्रिटीशांविरुद्ध अनेकांनी लढा पुकारला होता. हा लढा विखुरलेला होता. या लढ्याला संघटित स्वरूप देण्यासाठी अनेक भारतीय पुढारी पुढे सरसावले होते. अखिल भारतीय पातळीवर एक संघटना असावी असे त्यांचे मत होते.

राजकीय जान असलेल्या भारतीय पुढाऱ्यांना अखिल भारतीय स्वरूपाच्या संघटनेची दिवसेंदिवस निकड जाणवू लागली. देशव्यापी स्वातंत्र्य लढा उभा करण्यासाठी जनमत तयार करण्याकरीता अशी संघटना हवी होती. अशी संघटना उभारण्यासाठी लागणारी सामाजिक पूर्वतयारी झाली होती व पुरेसा अनुभवही आला होता.

दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, न्या. तेलंग, फिरोजशहा मेहता, डब्ल्यू. सी. बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनजी, आनंद मोहन बोस, लाल मोहन घोष, रहिमतुल्ला महंमद सयानी, जव्हेरीलाल उमाशंकर याज्ञिक, बद्रुद्दिन तय्यबजी, जी. सुब्रह्मण्य अय्यर, एस. सुब्रह्मण्य अय्यर, आनंद चारिलू आणि कालीचरण बॅनर्जी अशा प्रभूतींनी भारतातील अनेक भागात अखिल भारतीय संघटना उभारण्याचे बेत चालवले होते.

ए. ओ. ह्युम ह्या सेवानिवृत्त सनदी इंग्रज अधिकाऱ्याशी सहकार्य करून मुंबईतील राष्ट्रवादी राजकीय कार्यकर्त्यांनी 1885च्या डिसेंबरअखेर देशातील सर्व राजकीय पुढाऱ्यांची एक बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत सर्व नेत्यांनी मिळून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस स्थापन करण्याचे ठरविले. हा दिवस होता 28 डिसेंबर 1885. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष होते डब्ल्यू. सी. बॅनर्जी. मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज येथे कॉंग्रेसची पहिली बैठक पार पडली. यावेळी 72 प्रतिनिधी उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सुरुवातीच्या काळात दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वांच्छा, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यासारख्या मवाळ नेत्यांचे कॉंग्रेसमध्ये वर्चस्व होते. साधारणतः 1905 ते 1920या कालखंडादरम्यान भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल या लाल-बाल-पाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जहालमतवादी व्यक्‍तींचे वर्चस्व होते.

पुढे लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर 1920 पासूनचा पुढील कालखंड हा महात्मा गांधी यांचे युग म्हणून ओळखला जातो. याच कालखंडात कॉंग्रेसला पं. नेहरू यांचे नेतृत्व लाभले.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा अनेक महनीय व्यक्‍तींनी सांभाळली. स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्व भारतीय पुढाऱ्यांनी या कॉंग्रेसरूपी जहाजात बसून लढा दिला. त्याची फलश्रृती ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्‍ती मिळून भारताला स्वांतत्र्य मिळण्यात झाली. पारतंत्र्याच्या साखळीत अडकून पडलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी राजकीय संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.