कॉंग्रेस स्थापना दिन : पं. नेहरूंनी नियतीला कोणते वचन दिले होते?

‘फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीला एक वचन दिले होते. ते पुरे होण्याची वेळ आता आली आहे. पूर्णपणे नव्हे; तरी बऱ्याच अंशी. आज बरोबर मध्यरात्री जग झोपलेले असेल तेव्हा भारत जागा होईल, स्वातंत्र्याच्या प्रकाशात, नवे जीवन घेऊन.’

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय घटना समितीपुढे भारतीय जनतेला उद्देशून भाषण करताना हे उद्‌गार काढले. दिवस होता 15 ऑगस्ट, 1947.

भारत स्वतंत्र झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पं. नेहरू यांनी काढलेले हे उद्‌गार अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होते. कारण नेहरूंनी नियतीला असे कोणते वचन दिले होते जे आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर पूर्ण झाले.

31 डिसेंबर 1929 रोजी मध्यरात्री नव वर्ष सुरू झाले. यावेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले पं. नेहरू यांनी रावी नदीच्या काठी तिरंगा ध्वज फडकवला. तेव्हा नेहरू यांनी नियतीला एक वचन दिले होते तेही भारत स्वतंत्र होण्याच्या सतरा वर्षे अगोदर. तेथे जमलेल्या भारतीय जनसमुदायासमोर पं. नेहरूंनी घोषणा केली की, स्वातंत्र्य चळवळीचा उद्देश स्वराज्य मिळविणे हा आहे.

याच वेळी त्यांनी प्रतिज्ञा केली की, 26 जानेवारी 1930 रोजी सर्व लोकांनी सार्वजनिक सभांतून प्रतिज्ञा करून स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार करावा. याच दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन भारतीय राज्यघटना तयार झाल्यानंतर ती 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

पं. नेहरू यांनी नियतीला जे स्वतंत्र भारताचे वचन दिले होते ते 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून पूर्ण झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.