शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा राजकीय खेळ्या सुरू झाल्याच्या चर्चांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी जिल्हा आणि ब्लॉक युनिटस्सह संपूर्ण प्रदेश कार्यकारिणी बरखास्त केली. काँग्रेसच्या या मोठ्या निर्णयामागे लोकसभा निवडणुकीतील पक्षाची खराब कामगिरी हे कारण सांगितले जात असले तरी राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.
राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही भाजपने क्लीन स्वीप करत लोकसभेच्या चारही जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या झंझावातात दिवंगत नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य यांचाही कंगना रणौतकडून पराभव झाला होता. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या अधिकृत संदेशात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षांनी हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संपूर्ण प्रदेश कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष आणि ब्लॉक काँग्रेस समित्या तातडीने बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा प्रतिभा सिंह काही काळापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्य झाल्या आहेत. त्या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. 2022 मध्ये त्यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बराच काळ कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, पक्ष राज्यात आपल्या संघटनेची पुनर्रचना करणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
या राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून पीसीसीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखालील सरकार बऱ्यापैकी सुरक्षित आहे. पोटनिवडणुकीत जागा जिंकून काँग्रेसने आपली स्थिती मजबूत केली आहे.