मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या उलथापालथवर बोट ठेवत आपले मत मांडले आहे. काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अद्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही.
गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. “नरेंद्र मोदींच्या वादळापुढे भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाली आणि काँग्रेसच्या वाड्यातले उरले-सुरले वतनदार देखील सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा मुळापासू हादरला आहे. कॅप्टन अमरिंदर यांना काँग्रेस श्रेष्ठींनी पदावरून दूर केले. प्रदेशाध्क्ष नवजोतसिंग सिद्धूंनी पेढे वाटत भागडा केला. पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढचे संकट वाढवले. सिद्धूंच्या सततच्या कटकटीमुळे अमरिंदर यांना दूर केले. आता सिद्धूही गेले काँग्रेसच्या हाती काय उरलं?” असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.
दरम्यान, पक्षनेतृत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने अग्रलेखातून काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “भाजपाकडे मंत्रीपदं वाटण्याची क्षमता आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणं म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे, त्यामुळे काँग्रेसचे काय होणार असा घोर लागलाय. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी सुरू असलेले उपचार चुकीचे आहेत का याचा विचार व्हायला हवा. काँग्रेसनं उसळी मारून उठावं, मैदानात यावं अशी लोकभावना आहे पण त्यासाठी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या अमरिंदर सिंग यांच्याविषयी देखील शिवसेनेनं भूमिका मांडली आहे. “भाजपात जाण्याच्या शक्यतेला अमरिंदर सिंग यांनीच पूर्णविराम दिला आहे. पण आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते स्वत:चा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील असं दिसत आहे”, असे अग्रलेखात म्हटले आहे.
तसेच, “अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषीमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ७५ वर्ष पूर्ण झालेल्यांना सत्तेचं पद मिळत नाही असं मोदींचं धोरण आहे. अमरिंदर सिंग यांचं वय ७९ आहे. त्यामुळे हे कसं होणार?” असे अग्रलेखात नमूद केले आहे.