गांधी कुटुबाव्यतिरिक्‍त अन्य कोणाचेही योगदान कॉंग्रेसने मानले नाही – मोदी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभाराच्या ठरावाला उत्तर

नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कधीही गांधी-नेहरू कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्‍त अन्य कोणाचेही प्रयत्न ओळखलेच नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार दर्शक ठरावाच्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही टीका केली. कॉंग्रेसने आतापर्यंत कधीही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरसिंहा राव यांच्या चांगल्या कामांचा उल्लेखही केलेला नाही, असेही मोदी म्हणाले.

“देशाच्या प्रक्रियेमध्ये काही जणांनीच योगदान दिले, असे काही जणांन वाटते. अशा व्यक्तिंबाबतच बोलावे आणि अन्य लोकांकडे दुर्लक्ष करावे, असेही त्यांना वाटते. मात्र देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले आहे, असे आम्हाला वाटते. नरसिंह राव यांच्या किंवा अगदी मनमोहन सिंग यांच्या चांगल्या कामाबाबतही चर्चा केली जात नाही.’ असे पंतप्रधान म्हणाले.

“2014 लोक कॉंग्रेसला कंटाळलेले होते. तेंव्हा आम्ही नवीन होतो. पण किमान कॉंग्रेसपासून तरी वाचू असे लोक म्हणाले आणि आम्हाला विजयी केले. अहंकारानी ग्रासलेल्या कॉंग्रेसने देशावर आणिबाणी लादून भारतीयांचा आत्मा चिरडण्याचा गुन्हा केला. कॉंग्रेस हवेत उडत असल्याने जमिनीवरील सर्वांना क्षुद्र समजत आहे. मात्र आमचे स्वप्न इतकी मोठे नाही. आमचे स्वप्न मूळापर्यंत पोहोचण्याचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या पाच वर्षांच्या सरकारला मोठा जनाधार मिळाला. भाजपवर जनतेने दुसऱ्यांदा विश्‍वास टाकला आहे. 2014 मध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. यावेळी 300 पेक्षाही अधिक जागा भाजपला मिळाल्या. मात्र हे यश सहजसाध्य नव्हते. त्यासाठी अग्निदिव्य करायला लागले होते. सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता निवडणुका समाप्त झाल्या आहेत. संसदेमध्ये एकत्र काम करून लोकसेवा करणे हेच उद्दिष्ट आहे. कोण जिंकले, कोण हरले, यासारख्या निवडणुका होणे हा आपला सुसंस्कृतपणा नाही, असे मोदी म्हणाले. 17 वी लोकसभा गेल्या आठवड्यात अस्तित्वात आली असल्याने विरोधकांचे सहकार्य मिळवण्याच्या हेतून पंतप्रधानांनी आपला हेतू स्पष्ट केला.

Leave A Reply

Your email address will not be published.