पिंपरी – कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी वैयक्तिक बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली वक्तव्ये सामाजिक माध्यमातून प्रसारीत झाली आणि देशभरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याविरोधात देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांनीही या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र एनएसयुआयचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव आदींचा सहभाग होता.