कॉंग्रेसने छाटले पायलट यांचे पंख

उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदांवरून हकालपट्टी

जयपूर/नवी दिल्ली -बंडाचे निशाण फडकावून राजस्थानमध्ये राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या सचिन पायलट या तरुण नेत्याचे पंख कॉंग्रेसने मंगळवारी छाटले. पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा दोन्ही महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात पायलट यांनी बंड पुकारल्याने राजस्थानच्या सत्तारूढ कॉंग्रेसमध्ये रविवारपासून सत्तासंघर्ष उफाळून आला. त्यानंतर सोमवारी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीपासून पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार दूर राहिले. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. पायलट यांना दुसरी संधी देण्यासाठी मंगळवारी पुन्हा कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्याआधी पक्षाकडून आवाहन करण्यात आल्यानंतरही पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले.

बैठकीनंतर कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पायलट आणि दोन समर्थक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येत असल्याची घोषणा केली. पायलट यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आले. पुढे बोलताना सुर्जेवाला यांनी म्हटले की, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आशीर्वादामुळे पायलट यांना अतिशय तरुण वयातच राजकीय ताकद देण्यात आली. तसे असूनही पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या राजकीय कारस्थानाचा भाग बनून राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. कुठलाच राजकीय पक्ष ते सहन करणार नाही. त्यामुळे जड अंत:करणाने कॉंग्रेसला निर्णय घ्यावा लागला, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

पायलट यांच्या जागी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह डोटासरा यांची नियुक्‍ती करण्यात आली. प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष, कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष या पदांवरून पायलट समर्थकांची उचलबांगडी करण्यात आली. त्या पदांवर तातडीने नव्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. पायलट यांचे समर्थक असणाऱ्या अभिमन्यू पुनिया यांनी एनएसयूआयच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पायलट आणि त्यांच्या समर्थकांवरील कारवाईमुळे कॉंग्रेसने बंडखोरी मोडून काढण्यासाठी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे सूचित होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.