‘मोदीजी कोठे आहे आपली 56 इंची छाती?’; चीनने अरूणाचल मध्ये वसवलेल्या गावावरून कॉंग्रेसची मोदींवर टीका

नवी दिल्ली – चीनने अरूणाचल प्रदेशाच्या हद्दीत घुसखोरी करून एक स्वतंत्र गावच वसवल्याची घटना समोर आल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या संबंधात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, त्यांनी दिलेले आश्‍वासन तुमच्या लक्षात आहे का? (मै देश नही झुकने दुंगा). कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मोदींना या अनुषंगाने उद्देशून विचारले आहे की, मोदीजी कोठे आहे आपली 56 इंची छाती?.

या प्रकरणी सरकारने उत्तर देण्याची मागणी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनीही केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारतीय जनता पक्षाचेच अरूणाचल प्रदेशातील खासदार तापिर गाओ यांनी भारताच्या हद्दीत चीनने शंभर घरांचे एक गाव वसवले असल्याची माहिती लोकसभेत दिली होती.

जर आपल्याच पक्षाच्या खासदाराने दिलेली माहिती खरी असेल तर भाजपने पुन्हा एकदा चीनला क्‍लीन चीट दिली असल्याचे स्पष्ट होत असून आता त्यावर भारत सरकारचे काय म्हणणे आहे ते स्पष्ट व्हायला हवे आहे. चीनने अरूणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत साडे चार किमी आत घुसून हे नवीन गाव वसवले असल्याची बातमी एका दूरचित्रवाणीवाहिनीने काल प्रसारीत केली होती.

त्यावर भारत सरकारने मात्र आत्तापर्यंत केवळ सावधगिरीचीच भूमिका घेत मोघम प्रतिक्रीया दिली आहे. त्यात भारताने म्हटले आहे की, भारत सरकारचे या साऱ्या घडामोडींवर नीट लक्ष असून देशाच्या सार्वभौमत्वाच्या आणि प्रादेशिक संलग्नतेच्या संबंधात सरकारकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तथापि चीनने भारतीय हद्दीत शिरून स्वतंत्र गाव वसवले आहे की नाही यावर मात्र सरकारकडून अद्याप नेमके उत्तर दिलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.