मुंबई – केंद्रामध्ये मोदी सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून 500 रुपये किलो तर कांदा 100 रुपये किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वयंपाक घराचे बजेट कोलमडले आहे.
या महागाईमधून मोदी सरकार प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून वर्षाला 90 हजार रुपये लुटत आहे. जनतेच्या या मुळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे, कटेंगे, व्होट जिहादसारखी घोषणाबाजी केली जात आहे, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केला. त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटंगे तो कटेंगे’ घोषणेवर बंटेंगे तो आपके पॉकेट कटेंगे. यह हटेंगे तो दाम घटेंगे, यहा आमचा नारा असल्याचे सांगितले.
टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवन खेरा यांनी महायुती सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. पवन खेरा म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचा गल्लीमधील नेतेही जगातील सर्व मुद्द्यांवर प्रवचन देतात. पण जनतेला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवर एक शब्दही बोलत नाहीत, हीच भाजपच्या प्रचाराची दिशा आहे.
झारखंडमधील प्रचारात पंतप्रधान मोदींनी घुसखोरी झाल्याचे सांगितले. पण देशात तर 11 वर्षांपासून मोदींचेच सरकार आहे. मग ही घुसखोरी झालीच कशी?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राच्या प्रचारातही तेच होत आहे. बटेंगे कटेंगे, एक हैं, तो सेफ हैं, व्होट जिहाद हेच सुरु आहे. भाजप जनतेला मुर्ख समजत असेल. पण जनतेला भाजपचा हा डाव चांगलाच माहित आहे. एकीकडे प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून वर्षाला 90 हजार रुपये लुटतात, तर दुसरीकडे महिलांना 1500 रुपये दिल्याच्या फुशारक्या मारत आहेत. मोदी आणि भाजपने 90 हजार रुपयांच्या लुटीचा हिशाब द्यावा, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.