नवी दिल्ली – महाराष्ट्रातील निकालानंतर विरोधकांकडून आणि विशेषत: कॉंग्रेसकडून निवडणूक प्रक्रियेवर, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता भाजपनेही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. राहुल आणि प्रियंका गांधींसह कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आधी राजीनामे द्यावेत. तसेच, पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरू झाल्यानंतरच निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर करावे, असे थेट आव्हान भाजपने दिले.
ईव्हीएमवरून पुन्हा राजकारण तापल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला. कॉंग्रेसकडून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात आहे. मात्र, त्याच प्रक्रियेच्या माध्यमातून राहुल, प्रियंका आणि त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे.
गंमतीची बाब म्हणजे, ज्या दिवशी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले; त्याच दिवशी प्रियंका यांनी खासदारकीची शपथ घेतली. ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आले असल्याने राजीनामे दिले तरच कॉंग्रेसच्या नेत्यांची संबंधित मुद्द्याविषयीची खरी कळकळ दिसून येईल. अन्यथा, त्यांचे आरोप फक्त पोकळ शब्द ठरतील.
संबंधित मुद्द्यावर कॉंग्रेसने न्यायालयांतही जावे. अर्थात, खुद्द सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याचवेळा निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि ईव्हीएमची विश्वासार्हता या बाबींवर शिक्कामोर्तब केले आहे, अशी भूमिका भाटिया यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. लवकरच कॉंग्रेसचे अस्तित्व इतिहासाच्या पुस्तकांतील पानांपुरते मर्यादित राहील, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
.